वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
समाजातील गरीब मुलींना शिक्षणासाठी मदत आणि प्रोत्साहन अत्यंत महत्वाचे असून यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला तरच सावित्रीबाई फुले यांचा वसा घेतल्याचे सिद्ध होईल. तसेच महिलांना कुटुंबातील सर्व सदस्यांनी आदराचे स्थान द्यावे असे मत उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळच्या सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्षा सुनिता पावशेरे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सोमवारी (दि.३) ग्रामपंचायत कार्यालयात शिक्षिका आणि बालिका सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील सरपंच सुनिता पावशेरे यांनी कलदेव निंबाळा, समुद्राळ, कडदोरा गावातील शिक्षिकांचा स्मृतीचिन्ह,शाल देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलदेव निंबाळा येथील इयत्ता पहिली वर्गात शिकणाऱ्या प्रांजली बोधले या परितक्तेच्या गरीब कुटुंबातील मुलीला इयत्ता सातवी वर्गापर्यंत शिक्षणासाठी दत्तक घेतले. यावेळी प्रांजली बोधले या बालीकेचा शैक्षणिक साहित्य, शाल देवून सत्कार करण्यात आला. कलदेव निंबाळा जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका पाटील, शहीद भगतसिंग विद्यालयातील श्रीमती मेघा मते, जि.प. कडदोरा शाळेतील उर्मिला मुसळे, सुनिता पटवारी, समुद्राळ जि.प.शाळेतील रुपाली मुसळे, स्वामी नारायण विद्यालयातील रेणुका तेलंग आणि अंगणवाडी कार्यकर्ती यांचाही सुनिता पावशेरे यांनी यावेळी सन्मान केला.यावेळी रसिका पाटील, मेघा मते, सुनिता पटवारी यांनी मनोगत व्यक्त करुन सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देवून आभार व्यक्त केले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर नाटिका, गीते सादर करण्यात आली. रांगोळी स्पर्धेतील विजयी बालिकां संस्कृती दळवे, वेदिका घाडगे, काजल सरवदे यांनाही बक्षिसे देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या छाया भालेराव, पल्लवी डोणगावे, जयश्री बिराजदार, अलका पाटील, कविता रसाळ, विश्रांती जामगे, रतिका बोकडे, लता बलसुरे, सुलोचना गोंधळी, सुलोचना घोटमाळे, प्रतिक्षा घोटमाळे, रसिका ढोणे, पद्मीन डोणगावे, सुनिता सुर्यवंशी, कस्तुरा सरवदे, शिवकांता दळवे, सुरेखा पाटील, पल्लवी पाटील यांच्यासह युवती, बालिका उपस्थित होत्या. सुत्रसंचालन देविदास पावशेरे यांनी तर पल्लवी डोणगावे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल दासमे, अरविंद दळवे यांनी सहकार्य केले.