वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील बलसुर येथे कोरोना रुग्णाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत उपाययोजना करण्यासाठी शुक्रवारी (दि.२३ ) छत्रपती शिवाजी महाविद्यालयात जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश (दाजी) बिराजदार यांनी ग्रामपंचायत तथा ग्रामस्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांची बैठक घेतली .
बलसुर ग्रामपंचायत अंतर्गत कोरोना संसर्गित असणारे २२ रुग्ण असून कोरोना संसर्गाची वाढती साखळी तोडण्यासाठी सदरील बैठकीत विविध उपाययोजना करण्यात आल्या. यात ज्या संसर्गित रुग्णाच्या घरात वेगळे स्वच्छतागृह नाही अशा रुग्णांसाठी छत्रपती शिवाजी विद्यालयात विलगीकरण कक्ष चालू करण्यात येणार आहे.
बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. संचारबंदी नियमाप्रमाणे सकाळी ७ ते ११ या वेळे व्यतिरिक्त व्यावसायिक केंद्र उघडे ठेवल्यास त्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विना मास्क, विनाकारण फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा व कडक लॉकडाऊनचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
याव्यतिरिक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत प्रत्येक आशा कार्यकर्तीला ५० घरांची जबाबदारी देण्यात आली असून त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची पल्स ऑक्सीमीटरद्वारे ऑक्सीजन व थर्मल गनद्वारे तापमानाची तपासणी करण्यात येणार आहे. माझे गाव कोरोनामुक्त गाव या मोहिमेअंतर्गत प्रत्येकी ५० घरांना एका शिक्षकाची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याद्वारे कुटुंबांच्या व्यक्तींमध्ये लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून तपासणी करूण घ्यावी व संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवून फवारणी करण्याच्याही सूचना यावेळी प्रा. बिराजदार यांनी दिल्या.
सदरील बैठकीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामसेवक श्री पांढरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गाडेकर, आरोग्य सेविका सोनाली सगर, एमपीडब्ल्यू एस. एस. घंटे, बीट जमादार श्री राठोड, जि प शाळेचे केंद्रप्रमुख श्री. सोमवंशी, ग्रा.पं. सदस्य माधव नांगरे, पवन पाटील, अतुल हिंगमिरे, आयुब पटेल यांच्यासह जिल्हा परिषद व छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील शिक्षक व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.