तालुक्यातील गर्भवती स्त्री, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आणि कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्याचा दृष्टीने स्वतःच्या घराच्या बाजूला किंवा शेतामध्ये पोषणमूल्य असणारे अन्न उपलब्ध होणार आहे. तसेच आठवडी बाजारामध्ये जो भाजीपाल्यासाठी होणारा खर्च आहे तो कमी करून घरच्या घरी पिकवलेला विषमुक्त व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्या व फळभाज्या आहारामध्ये दररोज वापरता यावा तसेच रासायनिक खताचा वापर करून पिकवलेल्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे कुटुंबाचे आरोग्य धोक्यात चालले आहे हे लक्षात घेऊन उमेद अभियान अंतर्गत पोषण परसबाग विकसन मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे.
उमरगा तालुक्यामध्ये पोषणबाग निर्मितीसाठी गाव पातळीवर कार्यरत असलेले आरोग्य सखी, कृषी सखी, प्रेरिका, बँक सखी व एकूणच उमेदचे सर्व केडर यांचे मोलाचे योगदान आहे.