वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
५ व्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उमरगा येथील भारत विद्यालयातील इयत्ता नववीचा विद्यार्थी वेदांत संतोष पाटील याची निवड झाली आहे. दि. १८ जानेवारी २०२३ रोजी पाचवे एकदिवसीय विद्यार्थी साहित्य संमेलन उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येथे होणार आहे. या संमेलनाचा अध्यक्षही विद्यार्थ्यांमधूनच निवडला जातो. अध्यक्षपद निवडीसाठी विद्यार्थ्यांची नुकतीच निवड चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल स्वतःचे मत नोंदवणे, साहित्य विषयक प्रश्र्नोत्तरांना उत्तरे देणे, उत्स्फुर्त काव्यलेखन करणे आणि स्वत: लिहिलेले साहित्य सादर करणे असे निवड चाचणीचे स्वरूप होते. या निवड चाचणीमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांमधून भारत विद्यालय, उमरगा येथे इयत्ता नववी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. वेदांत संतोष पाटील हा सरस ठरला.
अध्यक्षपदासाठी त्याची निवड करण्यात आली. निवड समितीमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. बालाजी मदन इंगळे, कवी श्री कमलाकर भोसले, कवयित्री श्रीमती पुष्पलता पांढरे व साधन व्यक्ती रमेश मंमाळे यांचा समावेश होता. त्याच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.