वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा( बु) व वाशी नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूककीचा कार्यक्रम कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर जाहीर करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी राज्य निवडणूक आयोगास केली आहे. याबाबत त्यांनी पत्र ईमेल केले आहे.
या पत्रात म्हणले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत पुढील काही दिवसांत संपत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांना लोहारा (बु) नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदार यादी कार्यक्रम २०२०- २१ घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे १९ एप्रिल रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी नगरपंचायतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच दि. १९ ते २९ एप्रिल पर्यंत सदर यादीवर हरकती व सूचना या शहरातील जनतेकडून मागविल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील वाशी नगरपंचायत ची मुदत संपली आहे. याठिकाणीही प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवून घेण्यात आल्या आहेत.
एकंदरीत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्याचे पाहता पुढील काही दिवसांत निवडणूक होणार असल्याचे दिसून येत आहे. परंतु सद्यस्थितीत सर्वत्र कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. लोहारा व वाशी शहरातही कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. राज्य शासनाने कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संचारबंदी, लॉकडाऊनचे निर्णय घेतले आहेत. सध्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या परिस्थितीत निवडणूक घेण्यात आली तर शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याची व त्यांचे आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या परिस्थितीत निवडणूक होणे योग्य होणार नाही असे आम्हाला वाटते. तसेच पश्चिम बंगाल सह काही राज्यात निवडणुका होत आहेत. या दरम्यान च्या गर्दीमुळे त्या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या सार्वत्रिक निवडणुकीचे परिणाम संपूर्ण देश भोगत असताना पुन्हा राज्यात निवडणुका घेणे कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे सध्याचा कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन लोहारा, वाशी शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करून कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यावर लोहारा (बु) व वाशी नगरपंचायतकरिता सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात यावा अशी विनंती जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी या पत्राद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारणीची झूम मिटिंग पार पडली. यात प्रामुख्याने कोविड १९ च्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी लोहारा (बु) व वाशी येथील पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत निवडणुकीचा मुद्दा उपस्थित करून ही निवडणूक कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर घेण्यात यावी असे नमूद केले. यावेळी माजी आमदार राहुल मोटे, जीवनराव गोरे, संपतराव डोके , प्रतापसिंह पाटील, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, मधुकर मोठे, भास्करराव खोसे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, कळंब तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, वाशी तालुकाध्यक्ष दिलीप घोलप, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, महेश कदम, जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, कादर खान, भीमा स्वामी आदींची उपस्थिती होती.