लोहारा –
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी (दि. ८) बहुचर्चित कोरोना लसीकरण संदर्भात ड्राय रन मोहीम यशस्वीरित्या पार पडली. या मोहिमेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, प्रभारी तहसीलदार रोहन काळे, गटविकास अधिकारी एस ए अकेले आदीनी भेट देऊन आढावा घेतला.
कोरोना साथ रोगाने संपूर्ण जग हैराण झाले असताना आता यावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होणार आहे ही मोठी आशादायक बाब आहे. आता सुरुवातीला ही लस फ्रंटलाइन वर्कर्सना दिली जाणार असून या अगोदर या लसीकरण संदर्भात ड्रायरन (रंगिततालीम) मोहीम राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर व प्राथमिक आरोग्य केंद्र जेवळी येथे हे लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. लोहारा तालुक्यातील जेवळी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी नऊ ते दुपारी दोन या काळात लसीकरण संदर्भात ड्रायरण पार पडली. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशेष स्वच्छता करण्यात आली होती. आरोग्य केंद्र रांगोळी, फूलांनी व कोविड १९ साथरोग विषयी पोस्टर, बॅनरने सजविण्यात आले होते. यावेळी सुनियोजित शिस्तबद्ध अशी लसीकरणाची ड्रायरण (प्रात्यक्षिक) मोहीम पार पडली. सकाळी अकरा वाजता येथील ड्राय रण मोहिमेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, विभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे यांनी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ गजानन परळीकर, तहसीलदार रोहन काळे, गट विकास अधिकारी एस ए अकेले, साहाय्यक गट विकास संजय ढाकणे, डॉ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सरपंच मोहन पणुरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ आर के शेख, डॉ अमोल सूर्यवंशी, डॉ पी पी पिचे, ग्राम विकास अधिकारी शिवानंद बिराजदार आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात सुरुवातीला ८ हजार २७२ फ्रंटलाइन वर्करना लस द्यायचे असून अंतिम लसीकरण अभियान सुरू करण्यापूर्वी त्यातील अडचणी वेळीच लक्षात यावेत यासाठी लसीकरण संदर्भात ड्रायरण मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यात ड्रायरणसाठी तीन रुग्णालयाची निवड करण्यात आली. यात प्रत्येक ठिकाणी २५ असे एकूण ७५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष लस न देता लसीकरणाचे सर्व टप्पे राबविण्यात आले.
डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद