वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा येथील परिवर्तन फाउंडेशन आयोजित परिवर्तन महोत्सव – २०२१ शुक्रवारी (दि.१०) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रा. गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करजखेडचे सरपंच सुभाष कळसुले होते. यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे, पंचायत समिती सदस्या प्रणिता क्षिरसागर, पोलीस पाटील अनंत आदटराव तंटामुक्ती अध्यक्ष रवी आदटराव, परिवर्तन महोत्सव कार्याध्यक्ष जयंत आदटराव, नंदकुमार माळी, भुजंग पाटील, लिंबराज साळुंके, सुधीर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिप-प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. करजखेडा खंडोबा यात्रेचे औचित्य साधून परिवर्तन महोत्सव हा दर्जेदार कार्यक्रम गेल्या ८ वर्षापासून सातत्याने सादर होत आहे. मनोरंजन व प्रबोधन करत असतानाच गावात चांगले काम केलेल्या लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी सुरवसे यांनी केले. प्रा. गणेश शिंदे यांनी जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान देत उपस्थितांची मने जिंकली.ते म्हणाले की, लहान मुलांमधील योग्य वयात त्यांच्यातील सुप्त गुण हेरून त्या पद्धतीने पैलू पाडले तर हिच मुलं उद्याची जबाबदार नागरिक बनतील हे सांगत असताना त्यांनी इतिहासातील अनेक दाखले दिले. यावेळी झी टीव्ही वरील डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमातील सेमी फायनलिस्ट दिपक हुलसुरे यांच्या तुफानी सादरीकरणाने परिसर दणाणून गेला. त्यानंतर लावणी, लघुनाटिका इ. सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्राची जाधव, प्रांजली जाधव, पुजा गायकवाड, पवन अहेरकर या कलाकारांनी कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अच्युत आदटराव व शाहूराज दबडे यांनी केले तर आभार अनिल दुधभाते यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवर्तन फाउंडेशनचे शंकर वैरागकर, तुकाराम सुरवसे, बालाजी देवकर, लक्ष्मण शिंदे, अमृत सुरवसे, उद्धव कळसुले, खंडू लोखंडे, लक्ष्मण बनकर, लक्ष्मण चव्हाण, भैरवनाथ म्हेत्रे, कपिल चव्हाण, दयानंद वाघे, हनुमंत आदटराव, रमेश आदटराव, लखन पवार आदींसह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.