वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावच्या रहिवाशी असलेल्या मनीषा वाघमारे या तरूणीने कोरोना काळात रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत डबे पोहोचवले होते. त्यांच्या या कामाची दखल ‘डेटॉल’ या देशातील राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतली आहे. ‘डेटॉल सॅल्यूट्स’ या अभियानाअंतर्गत युवतीचा फोटो त्यांच्या हँडवॉश बॉटलवर छापला आहे. तसेच मनीषाला डेटॉल कंपनीकडून मानपत्रही देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती डेटॉलच्या ट्विटर हॅन्डलवरून प्रसिद्ध करण्यात आली आहे.मनीषा वाघमारे या उच्चशिक्षित तरुणीला समाजकार्याची आवड असल्याने गेल्या वर्षभरापासून ती कोरोना काळात आपली सेवा बजावत आहे. गतवर्षी जागृती ग्रुप पुणे अाणि होप फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांनी पुणे, उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये गरीब लोकांना अन्नधान्याचे कीट वाटप केले. पण यावर्षी तिने कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचे डब्बे पुरविण्याचे काम स्वखर्चातून हाती घेतले. रोज दिवसभरात दीडशेहून अधिक लोकांना कसबे तडवळे येथून ३० किलोमीटर गाडीवर उस्मानाबाद ला जाऊन शासकीय आणि खाजगी रुग्णालयात जेवणाचे डब्बे पोहोच करत अाहेत.सुरुवातीला त्यांनी अवघ्या शंभर डब्यापासून याची सुरुवात केली. मात्र, त्यांचे काम पाहून अनेक दानशूरांनी त्यांच्या या कार्याला आर्थिक हातभार लावला. त्यामुळे जेवणाचे डब्बे वाढविण्यात आले. वास्तविक पाहता मनीषा वाघमारे यांची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. १६ वर्षांपूर्वी त्यांच्या वडीलांचे छत्र हरवले होते. त्यांच्या आई अंबिका वाघमारे या चप्पल विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे त्यांचा हा व्यवसाय डगमगला आहे. तरीही त्यांनी मागे न हटता अन्नदान करण्याचे काम सुरू ठेवले आहे. या कामात आईसोबत तिच्या दोन बहिणी माया आणि तेजल या देखील सहकार्य करत असतात.मनीषाच्या याच कामाची दखल डेटॉल या राष्ट्रीय कंपनीने घेत डेटॉल हँडवॉश उत्पादनावर ‘डेटॉल सॅल्यूट्स’ या शीर्षकाखाली मनीषाच्या फोटोसह तिने केलेल्या कामाची माहिती छापली आहे. मनीषा ही पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. भविष्यात तिला अधिकारी व्हायचं आहे. पुण्यातील तिचे काही मित्रमैत्रिणी हे सामाजिक कार्यात योगदान देत असतात. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत मनीषाला समाजकार्याची आवड निर्माण झाली. संकटांना आणि परिस्थितीवर मात करत समाजकार्य करणार्या तिच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.———————
आईच्या संकल्पनेमधून आम्ही हा अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला आहे. सुरुवातीला आम्ही स्व:खर्चातून हा उपक्रम सुरू केला. आमच्या कार्याची माहिती दानशूरापर्यंत पोहचली. त्यांनी आर्थिक सहकार्य करण्यास सुरूवात केली. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना जेवणाचे डब्बे पुरविलो. याच कामाची दखल डेटॉल या राष्ट्रीय पातळीवर कंपनीने घेतली आहे. ही माझ्यासाठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. यापुढे देखील माझे काम सुरूच राहणार आहे. —- मनीषा वाघमारे,