वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत आणि संवर्ग कर्मचारी संघटना यांच्या वतीने राज्य शासनास व आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांना वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या विषयी निवेदन पत्र देण्यात आलेली आहेत. परंतु अनेक दिवसापासून नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी यांनी आंदोलनाची भूमिका घेऊन राज्य शासनाला १ मे पासुन संपावर जाणार आहे अशा आशयाचे पत्र दिलेले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख तथा लोहारा नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक अभिजित गोरे यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे की, नविन नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांची सरसगट समावेशन करणे, नगरपरिषद नगरपंचायत मधील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागारातून वेतन देण्यात यावे, नगरपरिषद कर्मचाऱ्यांना डी सी पी एस एन पी एस योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करणे, नगरपंचायत कर्मचारी यांचे प्रशिक्षण अभावी राहिलेले समावेशन करून प्रशिक्षण देणे, संवर्ग कर्मचाऱ्यांची जेष्ठता यादी प्रसिद्ध करुन सेवा जेष्ठता यादी प्रमाणे पदोन्नती देण्यात यावी, कर व प्रशासकीय सेवा स्वच्छता निरीक्षक सेवा अग्निषमन सेवा यांचे ग्रेड वेतन २८०० वरुन ४२०० करणे. तसेच कोविड १९ मुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना ५० लक्ष विम्याची रक्कम तात्काळ देणे तसेच त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे या आणि अन्य मागण्यांसाठी राज्य शासनास नोटीस दिलेली असून कोणत्याही परिस्थितीत मागण्या पूर्ण न झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही असे या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
———–
नगरपरिषद, नगरपंचायत आणि संवर्ग कर्मचारी संघटना यांच्या वतीने राज्य शासन व नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांना वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या विषयी निवेदन पत्र देण्यात आलेली आहेत. परंतु अनेक दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार आहे.
अभिजित गोरे,
राज्य प्रसिद्धी प्रमुख,
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत, संवर्ग कर्मचारी संघटना