उमरगा :
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता यास प्राधान्य देऊन सामाजिक समतेवर आधारित मानवतावादी जीवन मूल्यांची जोपासना करणारा भारतीय संविधान हा भारतीय नागरिकांचा आदर्श ग्रंथ असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा राज्यशास्त्र अभ्यासक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मांडले.
उमरगा तालुक्यातील येळी येथील भाऊसाहेब बिराजदार स्मारक विद्यालयात आयोजित ७३ व्या भारतीय संविधान दिनानिमित्त शनिवारी (दि. २६) रोजी भारतीय संविधानाचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र कांबळे हे होते. यावेळी संस्थेचे संचालक बब्रुवान औटे, राजेंद्र किरकोळ, पत्रकार योगेश पांचाळ, अमोल कटके, भैय्यासाहेब मुजावर, बालाजी आंबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. महेश मोटे म्हणाले की, भारतीय संविधान हा एक सामाजिक दस्तऐवज असून भारतीय जनता हाच संविधानाचा मुख्य स्त्रोत आहे. संविधान हा केवळ कायदा किंवा नियम यांचा केवळ एक संच नाही तर स्वातंत्र्य लढ्यातून पुढे आलेल्या मूल्यांचा आणि डॉ. बाबासाहेब यांच्या मुलभूत चिंतनाचा तो एक महत्वपूर्ण अविष्कार आहे. भारतीय संविधानात अत्यंत महत्त्वाच्या बाबींचा समावेश केला आहे. त्यामुळे भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट व सर्वसमावेशक असे बनलेले आहे. भारत देश हा विविधतेने नटलेला असतानाही इथे एकात्मता टिकून आहे ती केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळेच असे ते मत त्यांनी मांडले. अध्यक्षीय समारोपात महेंद्र कांबळे म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर आज भारतात लोकशाही व्यवस्था टिकून आहे ती केवळ संविधानामुळेच म्हणूनच या भारतीय संविधानाची जनजागृती होणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी या संविधानाचे वाचन केलेच पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश टोपगे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार राजेंद्र पटवारी यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने गावातील पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.