वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील किसान चौक नागरी समिती, मराठा सेवा संघ, किसान ब्रिगेड, मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १६) भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे होते. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, भारत शिक्षण संस्थेचे संचालक तानाजीभाऊ फुगटे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक माळी, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे, सचिव शरणाप्पा मुदकण्णा, नगरसेवक अजित चौधरी, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, आत्माराम वाघ, बाबुराव जाधव गुरुजी, माजी सैनिक व्यंकट चौधरी, प्रगतशील शेतकरी देवानंद बिराजदार, माजी नगरसेवक अशोक जाधव, युवासेना शहर प्रमुख भगत माळी, व्यापारी ज्ञानेश्वर चौधरी, विकास फुगटे, सुरेश मंगरूळे, श्रीधर इंगळे, राघू शिंदे, बाळू खंडागळे, अर्जुन खंडागळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मुंबईचे सेवानिवृत्त पोलिस उपआधीक्षक राजेंद्र नरसिंगराव पाटील यांचा प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती बद्दल त्यांचा नागरी समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. नुकताच रोटरी क्लबच्या वतीने रोटरी नेशन बिल्डर अवार्ड पुरस्काराने गौरविण्यात आलेले श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ. रविंद्र दादाराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना राजेंद्र पाटील म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल काळामध्ये बी.एस्सी. पदवी प्राप्त झाल्यानंतर स्पर्धा परीक्षाकडे वळलो. वडील शिक्षक असल्याने वैचारिक ग्रंथसंपदा मला लहानपणापासून वाचायला मिळाली. या सोबतच स्पर्धा परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. त्यामुळेच मला यश संपादन करता आले. पोलिस प्रशासनामध्ये सेवा करत असताना प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य केल्यामुळेच मुरुमची एक वेगळी ओळख महाराष्ट्रात निर्माण करता आली. अध्यक्षीय समारोप प्रसंगी दत्तात्रय इंगळे म्हणाले की, अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असून विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी अंबाबाई मंदिर समिती व किसान शिवजन्मोत्सव जयंती उत्सव समितीच्या वतीनेही उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नितीन डागा, अशोक माळी, लखन भोंडवे, बबलू अंबर आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव यांनी केले.