वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शेतकरी बांधवाचा मित्र म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बैलांचा कारवणी सण मंगळवारी (ता.१४) रोजी उमरगा तालुक्यातील मुरूम शहर व परिसरातील केसरजवळगा, आलूर, बेळंब, कंटेकूर, भुसणी, कोथळी, सुंदरवाडी गावात उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी एक प्रकारे दिवाळीच साजरी केली जाते. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि कृषी निगडीत सर्व अवजारांची वेळोवेळी विधिवत पूजन संपन्न होत असते. शेतीशी निगडीत असलेला बैलांसाठी कारवणी सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षापासून हा सण साजरा करण्याची परंपरा कायम चालू राहिली आहे. महाराष्ट्र राज्यात पोळा सण साजरा करण्यात येतो तर त्याचबरोबर कर्नाटक राज्याशेजारी वसलेल्या महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागात कारवणी सणही अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. या दिवशी बैलांना शेती कामासाठी सुट्टी दिली जाते. सकाळी अंघोळ घालून विविध रंगाने अंगावर रंगरंगोटी केली जाते. गोंडा, घागर मळा, शिंगांना रिबीन बांधून वाजतगाजत जल्लोषात गावातून मिरवणूक काढली जाते. पुरण-पोळी, भाताचा नैवैद्य देण्यात येतो. कारवणी सण साजरे करणारे शेतकरी बांधव पोळा सण साजरे करणाऱ्या शेतकऱ्यांना आजच्या रोजी आग्रहाचे निमंत्रण देत असतात तर पोळा सण साजरे करणारे शेतकरी कारवणी साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांना पोळ्यादिवशी भोजनासाठी निमंत्रण देत असतात. ही परंपरा मुरूम व परिसरात पिढ्यानपिढ्या अखंडपणे चालू आहे.