वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
रायगडावर ६ जून ला दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा होतो. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. तरीही यावर्षीचा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक होणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार्वभौम स्वराज्याचे प्रतीक असलेल्या ‘सुवर्ण होन’ च्या साक्षीने हा राज्याभिषेक सोहळा होणार आहे. अत्यंत दुर्मिळ असलेला हा सुवर्ण होन छत्रपती संभाजीराजेंनी अत्यंत कष्टाने मिळवला आहे. इतिहासकार, अभ्यासक, आणि शिवभक्तांसाठी हा अत्यंत अमूल्य ठेवा उपलब्ध करून दिल्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हे ‘सुवर्ण होन’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार्वभौम स्वराज्याचे प्रतीक आहे. महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला आणि आपले ‘सुवर्ण होन’ स्वराज्यात चलनात आणले. हे सुवर्ण होन आता शक्यतो पाहायला मिळत नाहीत. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच ते असतील. आपण सहसा जे पाहतो, ती शिवराई असते. शिवराई आपल्याला खूप भेटतील. परंतु होन भेटणे अत्यंत दुर्मिळ. आत्तापर्यंत अधिकृत बोलीमध्ये एका सुवर्ण होनची किंमत 80 लाख रुपये लावली होती. एका शिवभक्ताने स्वतःच्या वैयक्तिक कलेक्शन साठी एका होन करिता एक कोटी 25 लाख रुपये मोजले असल्याचे समजते. यावरून लक्षात येईल की या सुवर्ण होन चे किती महत्त्व आहे.
छत्रपती संभाजीराजे याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हणले आहे की, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन ‘होन’ च्या साक्षीने साजरा होणार… स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा ‘होन’ हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक ‘होन’च्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार अशी पोस्ट छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुकवर केली आहे.
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्यामुळे शिवभक्तांनी आपापल्या घरी राहूनच शिवराज्याभिषेक साजरा करावा असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी शिवभक्तांना केले आहे.