वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायत हद्दीतील दलित वस्ती निधीचा इतर प्रभागात गैरवापर करून निकृष्ठ नियमबाह्य कामे करणाऱ्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी व नगरअभियंता यांची तात्काळ चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी नगरसेवक शामसुंदर नारायणकर यांनी सोमवार ( दि. १) पासून लोहारा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास फकिरा ब्रिगेड सह अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
लोहारा नगरपंचायतचे शिवसेनेचे नगरसेवक शामसुंदर नारायणकर यांनी दि. २२ जानेवारीला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. या निवेदनात म्हटले आहे की, मी प्रभाग क्रमांक १० या आरक्षित प्रभागातून निवडून आलो आहे. माझ्या प्रभागात दलित वस्तीचा निधी टाकून कामे करण्याऐवजी खुल्या प्रभागात दलित वस्तीचा निधी वापरून निकृष्ठ दर्जाची नियमबाह्य कामे मुख्याधिकारी गजानन शिंदे, नगराध्यक्षा ज्योती दीपक मुळे, प्रभारी नगर अभियंता अमर राऊत यांनी संगणमताने केली आहेत. तसेच नगरपंचायत हद्दीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत (दलित वस्ती) कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर झाली होती. सदरील कामे करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना नगरपंचायत ने काही नियम व अटी घालून अंदाजपत्रकाप्रमाणे संबंधित योजनेअंतर्गत येत असलेले काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे शासन धोरणानुसार करणे अपेक्षित होते. परंतु मुख्याधिकारी, नगर अभियंता, नगराध्यक्षा यांनी प्रभाग क्रमांक १ ते २ व प्रभाग क्रमांक १० मधील गटारीचे काम जुन्या गटारी चांगल्या असताना संबंधित ठेकेदाराच्या व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी यांनी जुन्या गटारीमध्येच नविन काम दाखवून शासनाची दिशाभूल केलेली आहे. तसेच अनेक प्रभागामध्ये दलित वस्ती ऐवजी सिमेंट रस्ता व गटारीचे काम खुल्या वस्ती मध्ये करण्यात आलेली आहेत असे या निवेदनात म्हटले आहे.
याविषयी आपल्या स्तरावरून दि. ३१ जानेवारी पर्यंत लोहारा दलित वस्ती निधीतील नियमबाह्य कामाची व निधीचा इतर प्रभागात दुरुपयोग केले प्रकरणी भ्रष्टाचारातील सहभागी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, नगर अभियंता यांच्याविरुद्ध चौकशी समिती नियुक्त करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल न केल्यास दि. १ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे असा ईशारा नगरसेवक नारायणकर यांनी या निवेदनात दिला होता. त्याप्रमाणे सोमवारी ( दि. १) नगरसेवक शामसुंदर नारायणकर यांनी लोहारा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.