वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तालुका विधी सेवा समिती लोहारा व विधिज्ञ मंडळ लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय लोहारा येथे शनिवारी ( दि. २६) भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
भारतीय संविधान दिनानिमित्त लोहारा न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश एन.एस.सराफ यांनी भारतीय संविधानाचे वाचन केले. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश एस. एस. कळसकर, गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी यांच्यासह विधिज्ञ मंडळ, लोहारा शहरातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर न्यायालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुल, देवगिरी ग्लोबल अकॅडमी, न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल, जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यक्रम घेण्यात आला. यात सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी भारतीय संविधान दिनानिमित्त प्रास्ताविक केले. त्यानंतर या दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान या विषयावर पथनाट्य सादर केले. संविधान दिनानिमित्त शहरातील शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.