वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोरोना सारख्या जागतिक महामारीत सरपंच म्हणून मागील दोन वर्षातील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आपल्या कामाचा आदर्श इतरांनी घ्यावा अशा स्वरूपाचे प्रेरणादायी काम करणाऱ्या तालुक्यातील सास्तुर येथील सरपंच यशवंत कासार यांना शिवसृष्टी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.
मागील दोन वर्षे सर्वत्र कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत सरपंच या नात्याने गावचा प्रथम नागरिक म्हणून गावातील नागरिकांची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी सरपंच यांच्यावर आली होती. सर्व विभागांशी समन्वयक ठेवून नागरिकांना या संकटातून बाहेर काढणे मोठ्या जिकिरीचे काम होते. याचे भान ठेवून गावातील जे नागरिक बाहेरगावी ये जा करतात त्यांची त्या सर्वांची आवश्यकतेनुसार रॅपिड एंटीजन टेस्ट करणे, गावातील पंचेचाळीस वर्षावरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेणे, गावात घरोघरी जाऊन आशाताईच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला गावकऱ्यांची तपासणी करून त्यांची ऑक्सिजन लेवल, तापमान चेक करणे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला कोरोना कीट, विटामिन गोळ्या, सॅनिटायझर मास्क साबण उपलब्ध करून देणे, बाहेर गावातून आलेल्या प्रत्येक व्यक्तींना सक्तीने तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवस क्वारंटाइन करून कोरोनाची साखळी रोखण्याचा प्रयत्न करणे, प्रसंगी त्यासाठी गावकऱ्यांचा रोष घेणे, सगळ्या मोहिमेत गरजेनुसार गावासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करणे, कोरोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध घेऊन त्यांची तपासणी, उपचार, लसीकरण नियमांचे काटेकोर पालन या पंचसूत्रीचा आधारावर आपलं गाव पुर्ण कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सास्तूर येथील सरपंच यशवंत कासार यांना हा पुरस्कार दिला जात असल्याचे संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सरपंच यशवंत कासार यांनी केलेले हे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांना मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर केला आहे. लवकरच सरपंच कासार यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रा. सहदेव मोरे पाटील यांनी दिली आहे.