वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोमवारी दि. 12 जुलै रोजी 45 वर्षांच्या वरील नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. तसेच ज्यांना पहिला डोस घेऊन किमान 28 दिवस झाले आहेत अशांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील लोहारा, मुरूम, सास्तुर, तेर, वाशी, भूम ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, कळंब, परांडा उपजिल्हा रुग्णालय तसेच उस्मानाबाद येथील दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या 12 केंद्रावर ही लस देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे. या केंद्रावर केवळ 45 वर्षांच्या वरील नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच 45 वर्षांच्या वरील ज्या नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन 28 दिवस झाले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.