वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
3 लक्ष रु. पर्यंतच्या पीक कर्ज मंजुरीचे अधिकार भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखा व्यवस्थापकास देण्यात यावे तसेच बँकेतील रिक्त पदे भरण्यात यावीत अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे केली आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिल्ली येथे अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन याविषयी चर्चा केली.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात तसेच महाराष्ट्र राज्यात भारतीय स्टेट बँकेच्या अनेक शाखा ग्राहकांच्या सेवेत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. परंतु आरएसीसीकडे जिल्ह्यातील विविध शाखांमधील कर्जाच्या संदर्भात कर्जाची प्रकरणे प्रस्तावित आहेत. ज्यामुळे पीक कर्जाची कामे करण्यास 6 ते 12 महिने लागतात. त्यामुळे शेतकरी व बँक कर्मचार्यांना बरेच दिवस प्रक्रिया आणि मंजुरी होईपर्यंत थांबावे लागते. या सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकास पीक कर्ज वितरण करण्यास परवानगी नसल्याने व बँकेतील कर्मचारी पदे रिक्त असल्याने पीक कर्ज वाटपास बरेच दिवस विलंब लागत आहे. भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकास पीक कर्ज 3 लक्ष रु.पर्यंत मंजुरीचे अधिकार देणे व बँकेतील रिक्त पदे भरण्यासंदर्भात उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी देशाचे अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवतजी कराड साहेब यांची मंत्री महोदयांच्या नवी दिल्ली येथिल मंत्रालय दालनात भेट घेऊन मागणी केली आहे.