उस्मानाबाद :
राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 सोलापूर – उमरगा या महामार्गाच्या अपुर्ण कामाच्या संदर्भात आज दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे बैठक पार पडली. सदर बैठकीस खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह आमदार कैलास पाटील, नंदुभैय्या राजेनिंबाळकर, प्रकल्प संचालक, चिटणीस, एस.टी.पी.एल. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अनिल शर्मा, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, माजी तालुका प्रमुख सुरेश वाले, भगवान जाधव, दिलीप जोशी, सरदारसिंग ठाकुर उपस्थित होते.
सदरील बैठकीमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 सोलापूर-उमरगा महामार्गाचे काम करणाऱ्या एस.टी.पी.एल. कंपनीने 2016 मध्ये महामार्गाचे काम पुर्ण करणे अपेक्षित होते परंतु या कंपनीने सदरील महामार्ग पुर्ण केला नाही त्यामुळे महामार्गावर आजपर्यंत झालेल्या अपघातात मृत्यु पावलेल्या प्रवाशांची आकडेवारी संग्रहित करावी व त्या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कंपनीचे व सदरील ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय सदरील ठेकेदार व अधिकारी यांच्यावर धाक बसणार नाही अशी सुचना खासदार निंबाळकर यांनी केली.
सदरील एस.टी.पी.एल. कंपनी दिवाळखोरीत असल्याने सदरील कंपनीला या रस्त्याचे काम करणे शक्य नाही त्यामुळे सदरील कंपनीने दि. 11 नोव्हेंबर रोजी प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे काम वर्ग करणेसंदर्भात लेखी सहमती पत्र दिले आहे. त्यामुळे प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग यांनी या महामार्गाच्या अपुर्ण कामांची माहिती घ्यावी व सदरचे अपुर्ण काम 3 टप्प्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून चालू करणे मान्य केले. त्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत या रस्त्याचे अपुर्ण काम पुर्ण करणेबाबत कुठलाही प्रतिसाद किंवा कार्यवाही प्रकल्प संचालक यांच्याकडून न झाल्यास 1 जानेवारी 2023 पासून या महामार्गावरील टोल वसूली बंद करणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी व संबधित अधिकाऱ्यांच्या समवेत सांगितले तसेच प्रत्येक महिन्यातून एक बैठक मा. जिल्हाधिकारी यांनी घेवून या रस्त्यांचा प्रगती अहवाल तपासतील असे ठरले.
तसेच सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 या रस्त्याच्या शहरातील हद्दीबाबत विविध विषयावर चर्चा झाली यामध्ये प्रामुख्याने धाराशिव (उस्मानाबाद) शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 लगत सर्विस रोड केला नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होवून जिवीत हानी होत आहे. यापुर्वी बऱ्याच वेळा बैठका घेवून सदर सर्विस रोड करणेबाबत सुचना करुनदेखील अद्यापपर्यंत सर्विस रोडचे काम झाले नाही. सदर काम तात्काळ सुरु करावे तसेच उड्डाणपुलावर वीज नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने उड्डाणपुलावर (वरुडा रोड) विजेचे खांब बसवावे अन्यथा या महामार्गावरील टोल बंद करणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बैठकीत सुचना केल्या तसेच सुरत चेन्नई महामार्गाला जोडला जाणारा धाराशिव शहरापासूनच्या स्पर रोड संदर्भात देखील आढावा घेतला याबाबतचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाला दाखल झाला असल्याचे प्रकल्प संचालक यांनी सांगितले.