महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व माजी उपमुख्यमंत्री दिवंगत मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे एक दिवसीय महाराजस्व समाधान शिबिर उपक्रम विधानसभा मतदारसंघ स्तरावर राबविण्यात येणार आहे. सदर शिबिरात महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. तसेच विधानसभा स्तरावरील काही विशेष लाभांचे वितरणही सदर शिबिरामध्ये करण्यात येणार आहे.
त्यानुसार उमरगा-लोहारा विधानसभा स्तरावरील महाराजस्व समाधान शिबिर दि. 22 जुलै 2026 रोजी आदर्श महाविद्यालय उमरगा येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन खासदार ओमप्रकाश निंबाळकर, विधानपरिषद सदस्य बसवराज पाटील, विधानसभा सदस्य प्रवीणकुमार स्वामी यांचे हस्ते व जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर अन् उमरगा लोहारा तालुक्यातील नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच सदर महाराजस्व समाधान शिबिरासोबत मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष व शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक विविध सेवा देण्यात येणार आहेत.

तरी वरील दोन्ही शिबिराचे लाभ उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी उमरगा दत्तू शेवाळे, उपविभागीय अधिकारी लोहारा सागर नन्नवरे, तहसीलदार लोहारा रणजितसिंह कोळेकर, तहसीलदार उमरगा गोविंद येरमे यांनी केले आहे.








