उमरगा : भारत शिक्षण संस्था संचलित तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी, उमरगा येथील बी. फार्मसीचा विद्यार्थी सागर अप्पू जाधव याने फार्मास्युटिकल सायन्स क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या GPAT (Graduate Pharmacy Aptitude Test) व NIPER (National Institute of Pharmaceutical Education and Research) Entrance Examination मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सागर जाधव याने GPAT परीक्षेत 193 गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच NIPER प्रवेश परीक्षेत अखिल भारतीय क्रमांक (AIR) 923 प्राप्त करून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER), कोलकाता येथे पुढील उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कवलजीत बिराजदार, उपप्राचार्य प्रा. प्रशांत माने, बी. फार्मसी विभागप्रमुख डॉ. गणेश केशवशेट्टी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सागर जाधव याचा सत्कार करून त्याचे अभिनंदन केले. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देत भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला.









