सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करायला हवा. प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. आपणही प्रशासनास करणे आवश्यक आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

उमरगा तालुक्यातील बलसुर येथे गुरुवारी (दि.१९) राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पिकांची व साठवण तलावाची पाहणी केली. तसेच नाला सरळीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. पीक पाहणी व बलसुर येथील साठवण तलावाची पाहणी केल्यानंतर बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्यपालाचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सुरेशदाजी बिराजदार, उमरगा नगराध्यक्ष किरण गायकवाड, पंचायत समिती सभापती आकांक्षा चौगुले, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक अश्विनी भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते, जिल्हा परिषद सदस्या सविताताई बिराजदार, तहसीलदार गोविंद येरमे, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, युवा नेते रामकृष्ण बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके उपस्थित होते.

सुरुवातीला जिल्हाधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी पीपीटीद्वारे राज्यपालांना जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती सांगितली. तसेच प्रशासनाकडून काय काय उपाययोजना करण्यात येत आहेत याची माहिती सांगितली. यावेळी सुरेशदाजी बिराजदार यांनी या भागातील परिस्थितीविषयी सविस्तर माहिती सांगितली. या भागात १९९३ साली महाप्रलयंकारी भूकंप झाला होता. आता भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. ऊसासह सर्व पिके पाण्याअभावी वाया गेली आहेत. परंतु ऊस उत्पादकासाठी विमा किंवा अनुदान मिळत नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगाराच्या संधी संपल्या आहेत. त्यामुळे या भागातील तरुण रोजगाराच्या शोधात स्थलांतर करत आहेत. त्यामुळे या भागातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर एक लाख रुपये मदत द्यावी, पशुधनासाठी चारा उपलब्ध करून द्यावा, विद्यार्थ्यांची सर्व शुल्क माफ करावे, जी राम जी योजनेच्या काही जाचक अटी शिथिल कराव्यात, पीक विमा देण्यात यावा, या भूकंपग्रस्त भागातील गावांचे जे प्रलंबित प्रस्ताव आहेत ते मंजूर करण्यात यावेत, १६ खेडी योजना तात्काळ चालू करावी आदी मागण्या यावेळी सुरेश बिराजदार यांनी केल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे काही निवेदन देण्यात आले. यावेळी काही शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीची माहिती माननीय राज्यपाल महोदयांना दिली. गावात पाण्याची भीषण परिस्थिती आहे. आमचा जिल्हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. उजनीचे पाणी लवकर येणे गरजेचे आहे. आम्हाला पाणी द्या अशी मागणी केली. यावेळी आ. प्रवीण स्वामी यांनीही परिस्थिती सांगितली. या भागातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की, तुमच्या भागात १९९३ ला भूकंप झाला. आता दुष्काळी परिस्थिती आहे. तुम्ही खूप अडचणीतून जात आहात. सध्या काय उपाययोजना करता येतील व भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे प्रशासन काम करत आहेत. पाणी आवश्यक आहे. परंतु ज्यावेळी जास्त पाऊस होतो. त्यावेळी आपण पाणी वाया घालवतो. ते पाणी संरक्षित केले पाहिजे. याठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. आपण सोयाबीन प्रमाणे ऊस पिकासाठी अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे. ती मी नक्कीच शासनाला सांगेन व यावर मार्ग काढायला सांगेन. कारण त्यासाठी काय कष्ट आहेत ते तुम्हाला माहिती आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्यात आली आहे. आणखीही मदत करण्यात येणार आहे. प्रशासनाचे काम सुरू आहे. तुम्ही त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. जलसंरक्षण फक्त तोंडाने बोलून होणार नाही. ते प्रत्येकाने केले पाहिजे. अडचणी खूप आहेत, त्यावर उपायही आहेत. नागरिकांना अडचणी निर्माण होणार नाहीत. मी याठिकाणी नंतर ज्यावेळी येईन त्यावेळी नक्कीच हे गाव बदललेलं दिसलं पाहिजे. गेल्यावर्षी जास्त पाऊस झाला, यावर्षी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे ज्यावेळी जास्त पाऊस होईल त्यावेळी पाण्याचे संरक्षण करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भेट म्हणून दिले नांगर
राज्यपाल दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आपल्या आले आहेत. म्हणून बलसुर येथील शेतकऱ्यांनी शेतीचे प्रतीक असलेले नांगर त्यांना भेट म्हणून दिले.






