लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी भाजपाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत बुधवारी (दि.२) लोहारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यात मागील एक-दोन महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने सध्या अत्यंत गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून अनेक शेतकऱ्यांची पिके करपण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिकांना आवश्यक ओलावा उपलब्ध नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत तसेच मजुरी यासाठी मोठा खर्च केला आहे. मात्र पावसा अभावी हा संपूर्ण खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने तातडीने आर्थिक मदत देणे अत्यंत गरजेचे आहे. पाऊस लांबल्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. विहिरी,

बोअरवेल व इतर जलस्रोतांवरील पाण्याची पातळी कमी होत असून जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता याबाबतही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व रोजगाराच्या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
त्यामुळे लोहारा रा तालुक्यातील सद्यस्थितीचा तातडीने सर्वे करून दुष्काळसदृश परिस्थितीची अधिकृत नोंद घ्यावी व तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी. तसेच गावनिहाय व शेतनिहाय सरसकट पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्जावरील सवलती अथवा पुनर्गठन, वीजबिल व इतर शासकीय देयकांबाबत उपलब्ध असलेल्या सवलतींचा लाभ मिळवून द्यावा. पाणीटंचाई निर्माण झाल्यास तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. आवश्यक ठिकाणी पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करावी. तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करून पुरेसा चारा व पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सचिव शिवशंकर हत्तरगे, नगरसेवक दिपक मुळे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, कृ. उ. बा. समिती संचालक हरी लोखंडे, तालुका सरचिटणीस निकेश बचाटे, ॲड. रविकांत भोंडवे, रमेश भुरे, विनोद मोरे, विकास ननवरे आदी उपस्थित होते.







