वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दि. १९ फेब्रुवारी २०२१ ला दरवर्षीप्रमाणे किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात जिजाऊ ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा प्रवक्ता रेखाताई नितीन सूर्यवंशी यांच्या शिवशाही या काव्यसंग्रहाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, डॉ. अमोल कोल्हे, आमदार विनायक मेटे, अतुल बेनके, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, आयुष प्रसाद, निर्मला पानसरे, श्याम पांडे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, राजू डुबल, रवींद्र भुट्टे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पाळणा म्हणून शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेखाताई सूर्यवंशी यांनी जिजाऊ वंदना गायली. यानंतर शिवनेरी भूषण पुरस्कार व शिवाजी महाराज गौरव पुरस्कार देण्यात आले. मुख्य कार्यक्रमामध्ये जिजाऊ ब्रिगेड उस्मानाबाद जिल्हा प्रवक्ता रेखाताई नितीन सूर्यवंशी यांच्या “शिवशाही” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्वांनी पुस्तकाचे भरभरून कौतुक केले.
शिवशाही काव्यसंग्रह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची गौरवगाथाच आहे. या पुस्तकास मा. पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांची विस्तृत, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी प्रतिक्रिया लाभली आहे. खेडेकर साहेबांनी रेखाताईच्या काव्याची तुलना महान मराठी ऐतिहासिक कवयित्रींच्या काव्याशी केली आहे. त्यांच्या मते हा काव्यसंग्रह विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय, मीडिया, चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवकीर्तनकार, प्रवचनकार या सर्वांसाठी निश्चितच पूरक आहे . या काव्यसंग्रहास प्रसिद्ध कवी डॉ. बालाजी मदन इंगळे यांची साजेसी प्रस्तावना आणि द यंग आंत्रपंन्योर विजेते शरद तांदळे यांची प्रतिक्रिया लाभली आहे. उस्मानाबादचे माजी खासदार मा. रवींद्र गायकवाड सर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. एकूणच हे पुस्तक सर्व शिवप्रेमी आणि अभ्यासकांसाठी अत्यंत प्रेरक ठरणार असल्याचे रेखाताई सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.