वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भातागळी येथे गुरुवारी (दि.२२) कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत गावातील एकूण १०० नागरिकांनी लस घेतली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या दरम्यान तालुक्यातील भातागळी येथील जि प शाळेत गुरुवारी ( दि. २२) ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. वि. का. सोसायटीचे चेअरमन नागनाथ कारभारी यांनी या मोहिमेचे उद्घाटन केले. यावेळी गावातील एकूण १०० नागरिकांना लस देण्यात आली. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून लस घेण्यास पात्र असलेल्या नागरिकांनी नोंदणी करून लस घ्यावी असे आवाहन उपसरपंच हणमंत कारभारी यांनी यावेळी केले. यावेळी सरपंच दत्ता हजारे, ग्रामसेवक तानाजी जाधव, उपसरपंच हणमंत कारभारी, ग्रा.प.सदस्य दैवशाला जगताप, बालाजी आनंदगावकर, फुलचंद जगताप आदी उपस्थित होते.
या मोहिमेसाठी आशा कार्यकर्त्या योगिता आनंदगावकर, अनिता काजळे, महेश इंगळे, बालाजी जगताप यांनी परिश्रम घेतले. गुरुवारी झालेल्या लसीकरण मोहीमेत १०० नागरिकांनी लस घेतली. एवढीच लस उपलब्ध असल्याने बहुतांश नागरिक अद्याप लस घेऊ शकले नाहीत. त्यामुळे पुरेशी लस उपलब्ध करून आणखी दोन तीन दिवस ही मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.