वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व माजी आमदार राहुलभैय्या मोटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी ( दि.२५) मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी या मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.
विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई रक्कम अदा केलेली नाही. त्याबाबत राज्य सरकारच्या वतीने कृषी मंत्री दादा भुसे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा म्हणून राज्य सरकारने केलेले नुकसानीचे पंचनामे ग्राह्य धरण्यात यावे असे आदेश पिक विमा कंपन्यांना निर्गमित करुन कळविण्यात आल्याचे सांगितले होते. परंतु अद्याप त्याची विमा कंपनीने दखल घेऊन शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम अदा करण्याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. या बाबींकडे लक्ष वेधून उचित कार्यवाहीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली. याबाबत अजित दादांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांना सुचना केल्या. त्यानंतर माजी आमदार राहुल मोटे व जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांची भेट घेतली. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही तातडीने करून शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली.

ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. नाले, बंधारे तुटून अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बनमी, कडब्याच्या बनमी, फाटासकट वाहून गेल्या होत्या. या नुकसानीची भरपाई म्हणून पीक विम्याची रक्कम मिळणे आवश्यक आहे.

विमा कंपन्या ह्या प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत असल्याने केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन न झाल्यास उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने विमा कंपनी, केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची देखील तयारी करत असून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देण्यासाठी सर्व बाजूंनी लढा उभारून शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम खात्यावर जमा होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली.






