कु. सक्षणा सलगर यांना अर्वाच्य भाषेत धमकी देणाऱ्यास कडक शिक्षा द्यावी - उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी - जिल्हा पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन यांना दिले निवेदन - Vartadoot
कु. सक्षणा सलगर यांना अर्वाच्य भाषेत धमकी देणाऱ्यास कडक शिक्षा द्यावी – उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी – जिल्हा पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन यांना दिले निवेदन
वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा कु. सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि. ५) जिल्हा पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा कु. सक्षणा सलगर यांना काही गावगुंडांनी शनिवारी दिनांक 3 जुलै रोजी संध्याकाळी 06 वाजून 14 मिनिटांनी फोनवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकी दिलेली आहे. सदरील व्यक्तींनी गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आहोत असाही उल्लेख केला आहे. एका महिला, मुलींना अपमानास्पद व लज्जास्पद भाषेत बोलणे हा गुन्हा असून सदर व्यक्ती विरोधात कठोर कारवाई करून एक चांगला सामाजिक पायंडा घालावा. कु. सक्षणा सलगर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा असल्याने त्या महाराष्ट्रभर दौरा करत असून संदर्भीय धमकीच्या अनुषंगाने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
कु. सक्षणा सलगर यांनी गोपीचंद पडळकर यांच्या घेतलेल्या समाचाराच्या पार्श्वभूमीवर एका माथेफिरु तरुणाने कु. सलगर यांना कॉल करून अर्वाच्य भाषा वापरत “मी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असून तु त्यांच्यावर परत टीका करू नको, नाहीतर तुला जिवंत गाडीन” अशी धमकी दिली. सदर युवकाने वापरलेली भाषा ही लांच्छनास्पद असून महिला किंवा तरुणीवर असे वक्तव्य करणारी ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला छेद देणारी आहे. तरी सदर माथेफिरू तरुणावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजतीलक रौशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद विधानसाभा अध्यक्ष अमित शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष वाजिद पठाण, शहराध्यक्ष आयाज शेख, तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब जमदाडे, नगरसेवक गणेश खोचरे, महेश नलावडे, प्रदेश युवक राष्ट्रवादीचे प्रशांत कवडे, वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, अमोल पाटील, रणजीत दांगट, धीरज घुटे, अभिजित जगताप आदी उपस्थित होते.