वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ६ च्या नूतन नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी प्रभागातील नागरिकांसाठी कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजना सुरू केली आहे. या योजनेचा गुरुवार (दि.२७) पासुन प्रारंभ करण्यात आला.
लोहारा नगरपंचायत निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याप्रमाणे शहरातील प्रभाग क्रमांक ६ हा संपूर्ण घरपट्टी, नळपट्टी मुक्त वॉर्ड करण्यासाठी नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांच्या माध्यमातुन कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजना पुढील पाच वर्षे सतत राबविण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात गुरुवारी करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहा मधील घरपट्टी, नळपट्टी पूर्ण भरणाऱ्या नागरीकाचा नगरसेवकाच्या माध्यमातुन १० टक्के कर भरण्यात येणार आहे. या योजनेची गुरुवारी सुरुवात झाली असून प्रत्यक्षात तीन जणांच्या कराचा भरणा करत काम सुरु करण्यात आले आहे. यावेळी लोहारा नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरपंचायतचे कर्मचारी श्रीशैल्य मिटकरी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.