वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
वाळूच्या वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकारणी उमरग्याचे तहसीलदार राहुल पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.२४) ताब्यात घेतले असून याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती यअशी की, तक्रारदार यांना त्यांच्या शेतामध्ये घराचे बांधकाम करायचे असल्याने त्यांना चार ट्रक वाळूची आवश्यकता होती. म्हणून तक्रारदार हे आज रोजी पंचांसह तहसीलदार राहुल पाटील यांची भेट घेण्यासाठी त्यांचे शासकीय निवासस्थानी जाऊन याबाबत त्यांना बोलले असता त्यांनी मध्यस्थी मार्फत चार ट्रक वाळू घेण्यासाठी व त्या वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांना एका ट्रकला 5000/- रुपये प्रमाणे चार ट्रक वाळूसाठी 20,000/- रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले व 20,000/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. सापळा अधिकारी उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्यासह पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले, विष्णू बेळे , विशाल डोके, जाकेर काझी यांच्या पथकाने उमरगा येथे ही कारवाई केली. तहसीलदारच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्याने महसुल विभागात एकच खळबळ उडाली आहे.