लोहारा (Lohara) शहरामध्ये डेंग्यू प्रादुर्भाव व प्रसार कमी करण्यासाठी नगरपंचायत (nagar panchayat) लोहारा तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने लोहारा शहरांमध्ये प्रत्येक घरामध्ये डास सदृश्य अळ्यांचा नाश करण्यासाठी अबेटिंग करण्यात येत आहे. परंतु यावर वेळीच आळा घालण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे.
मागील दोन आठवड्यापासून लोहारा शहरामध्ये दोन ते तीन डेंगूचे रुग्ण आढळून आले आहेत असे शासकीय नोंदीनुसार दिसून येत आहे. परंतु खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या विचारात घेता, ही संख्या जास्त आहे. त्यामुळे तालुका समितीचे अध्यक्ष तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन आढावा घेतला तसेच काही सूचना दिल्या. या बैठकीमध्ये डॅा. अभिजीत बनसोडे यांनी मार्गदर्शन केले होते. त्यानुसार मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांचे आदेशान्वये लोहारा शहरातील सर्व घरांमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे पर्यवेक्षक तसेच आशा सेविका व नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी यांचे माध्यमातून अबेटिंग प्रक्रिया राबविण्यात आली. हीच प्रक्रिया पुन्हा पंधरा दिवसानंतर अशी पुढील दोन महिन्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे नगरपंचायत कडून सांगण्यात आले. तरी नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा व डेंग्यू आजारापासून बचाव करण्यासाठी कोणत्याही प्रकारे पाणी साठवून राहणार नाही व डासांची निर्मिती होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. आपल्या आजूबाजूला ताप व आजारी रुग्ण असल्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
डेंग्यूचे रुग्ण वाढले
लोहारा शहरासह तालुक्यातील अनेक गावांत डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. लहान मुलांचेही प्रमाण अधिक आहे. ग्रामीण रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
लोहारा शहरात स्वच्छता हवी
लोहारा शहरातील अनेक ठिकाणी घाण पाणी साचून राहते. त्यामुळे त्याठिकाणी डासांची उत्पत्ती होते. तसेच गटारीही वेळेवर साफ केल्या जात नाहीत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य आहे. याठिकाणी गटारी तुंबल्या तरीही कुणी लक्ष देत नाही. परिणामी डासांची निर्मीती होते. त्यामुळे शहरातील गटारींसह पाणी थांबून असलेल्या ठिकाणी नगरपंचायत कडून फवारणी, स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.