बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी धाराशिव येथे आज जन आक्रोश मोर्चा निघणार आहे.
आज सकाळी दहा वाजता धाराशिव शहरातील जिजाऊ चौकातून या मोर्चास सुरुवात होणार आहे. या मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी रस्ता खुला राहावा, या मोर्चामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असल्याचे पोलीस विभागाने सांगितले आहे. धाराशिव येथे होणाऱ्या जनआक्रोश मोर्चात संभाजीराजे छत्रपती, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, खासदार सहभागी होणार असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
या मोर्चास सकाळी दहा वाजता जिजाऊ चौकातून सुरुवात होईल. हा मोर्चा लेडीस क्लब मार्गे, संत गाडगेबाबा महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे.








