लोहारा तालुक्यातील हराळी येथील माजी सरपंच व त्यांच्या सख्या पुतण्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१६) रात्री साडे अकराच्या सुमारास हराळी गावाजवळ घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील हराळी येथील माजी सरपंच युवराज शंकराव पाटील- सूर्यवंशी हे सदन शेतकरी असून त्यांचा जेसीबी व ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. शनिवारी (दि.१६) रात्री साडे अकराच्या सुमारास डिझेल आणण्यासाठी मोटर सायकलवर जेवळीकडे जात होते. हराळी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर भरधाव मोटर सायकलचा ताबा सुटून मोटरसायकल रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडल्याने मोटर सायकल स्वार माजी सरपंच युवराज शंकरराव पाटील- सूर्यवंशी (वय ६५) व त्यांचा सख्खा पुतण्या गणेश दगडू पाटील गंभीर जखमी झाले. परंतु रात्रीची वेळ असल्याने तसेच खड्ड्यात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे असल्याने हा अपघात कोणाच्या नजरेस आला नाही. यामुळे वेळेवर मदत न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाला नाही. डिझेल घेऊन शेताकडे गेले असतील असा समज त्यांना झाला. पहाटे व्यायामासाठी गेलेल्या युवकांना ही घटना नजरेस पडली. त्यानंतर नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. परंतु त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. सख्ख्या काका पुतण्याचा व माजी सरपंच असलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे, बीट अंमलदार कान्तू राठोड घटनास्थळी दाखल होत केला. मृतांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.