शनिवारी (दि.२०) उमरगा-लोहारा तालुक्यात सर्वत्र विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात सगळ्यात दुःखद घटना म्हणजे लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील सुशिक्षित तरुण शेतकरी प्रद्युम्न लोभे यांच्या शेतात विज पडून ३ म्हशी दगावल्या.
प्रद्युम्न लोभे हे पूर्वी पुणे येथे एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होते. परंतु आई-वडिलांना मदत करण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी गावाकडे येऊन शेती करण्याचे ठरविले. त्यात शेती केवळ दोनच एकर असल्याने सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांनी शेतीस जोडधंदा म्हणून शेतात पत्र्याचे शेड मारून ५ म्हशी घेऊन दुग्धव्यवसायास सुरुवात केली होती. परंतु शनिवारी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून त्यांच्या ३ म्हशी दगावल्या. यामुळे लोभे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच ॲड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांनी कानेगाव येथे जाऊन लोभे कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे दुःख ऐकून घेतले. या घटनेने खचून न जाता पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करावी असा धीर देऊन आमदार ज्ञानराज चौगुले हे आपणास शासनाकडून नक्की मदत मिळवून देतील अशी ग्वाही दिली. प्रद्युम्न लोभे यांच्या आईला तुमचा मुलगा कर्तुत्वान असुन तो नव्याने उभारी घेईल व त्याच्या जीवनात नक्की यशस्वी होईल, तुम्ही शोक आवरा असे बोलत त्या माऊलीला धीर दिला. तसेच ज्ञानज्योती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाच्या पुनर्भरणीसाठी मदतही केली.
यावेळी सुभाष कदम, युवा सेना तालुकाप्रमुख दत्ता मोरे, उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी, लिंबराज पाटील, तुकाराम भारती, राजेंद्र कदम, मुकुंद कदम, शिवराज राजपूत, बाळासाहेब कदम, भरत कदम, श्रीमंत कदम, ऋषी कदम आदी जण उपस्थित होते.