धाराशिव दि.२७ (जिमाका) जिल्ह्यात सुरु असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पांबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.याबाबत काही वादही निर्माण झाले आहेत.या संदर्भातील जिल्ह्यातील सर्व वाद आणि तक्रारींचे निराकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांनी सांगितले.
दि. २७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक डॉ. घोष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलिस अधिक्षक संजय जाधव, अपर पोलिस अधिक्षक गौहर हसन, अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, उपविभागीय अधिकारी संजय डव्हळे, तहसीलदार मृणाल जाधव, तुळजापूर अरविंद बोळंगे, तसेच महाऊर्जा, संबंधित विविध विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. काही उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ऑनलाईन सहभागी होते.
जिल्हाधिकारी डॉ.घोष यांनी महाऊर्जा विभागाच्या वतीने जिल्ह्यात परवानगी देण्यात आलेल्या पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पाबाबत माहिती घेतली. तसेच प्रकल्प उभे करण्यासाठी पवन ऊर्जा कंपन्या कोणत्या प्रक्रिया राबवतात, कंपनीला परवानगी देत असताना कोणकोणत्या नियमांची अंमलबजावणी करावी लागते, महाऊर्जा विभाग अशा प्रकल्पाबाबत कोणकोणती कागदपत्रे घेते याबाबत महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. प्रकल्पांशी संबंधित असलेल्या कोणात्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याचा विचार केला जाणार असल्याचे डॉ.घोष यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे पवन ऊर्जा कंपन्यांना जिल्हास्तरावर विविध स्वरुपाच्या परवानगी देण्यासाठी नियमावली बनविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
महाऊर्जा विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पवन ऊर्जा प्रकल्पांची उभारणी असली पाहिजे असे सांगून डॉ.घोष म्हणाले,हे पवन ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प किती क्षमतेचे आहे, त्याचे क्षेत्र किती आहे हे तपासून घ्यावे.बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी सुनावणी घेण्यात येणार आहे.जेथे तक्रारी आहेत त्याठिकाणी जावून अधिकारी भेट देवून संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतील.कोणतीही ग्रामपंचायत पवन ऊर्जा कंपनीला परस्पर नाहरकत प्रमाणपत्र देणार नाही याबाबत आपण जिल्हा परिषदेमधून लेखी कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस अधिक्षक श्री.जाधव म्हणाले, जानेवारी महिन्यापासून उपविभागीय अधिकारी पातळीवर पवन ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे.बैठकीबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी,यासाठी बैठकीची निश्चित तारीख प्रसिध्दी माध्यमातून कळविण्यात येईल.दर महिन्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेऊन पवन ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित समस्येवर मार्ग काढण्यात येईल. तसेच सर्वांना विश्वासात घेवून हे काम करण्यात येईल,यामध्ये पारदर्शकता राहणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्ह्यातून विविध ठिकाणहून पवन ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी या बैठकीत समितीपुढे पोटतिडकीने मांडल्या. आपल्याला पवन ऊर्जा कंपन्यांकडून होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी तसेच योग्य मोबादला कंपन्यांनी शेतकऱ्यांना द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी पवन ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी आपले लेखी निवेदन पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीकडे सादर केली.