धाराशिव दि.१३ एप्रिल – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ रोजी “जय भीम पदयात्रा” मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव येथे कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यांनी हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेस सुरुवात केली. यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. पदयात्रेत जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, उपशिक्षणाधिकारी डी.एस.लांडगे, शिक्षण विस्तार अधिकारी डी.एम.जंगम व काझी, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते. सूत्रसंचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे यांनी केले.

ही पदयात्रा श्री तुळजाभवानी स्टेडियमपासून सुरू होऊन नगरपरिषद,पोलीस अधीक्षक कार्यालय,कोहिनूर हॉटेल,दूरदर्शन केंद्र,समता कॉलनी मार्गे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचून जिल्हा क्रीडा संकुलात पदयात्रेची सांगता झाली. या पदयात्रेत आर्य चाणक्य विद्यालय, भाई उद्धवराव पाटील विद्यालय, भारत विद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, श्रीपतराव भोसले हायस्कूल, शासकीय नर्सिंग व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि खो-खो खेलो इंडिया सेंटर येथील सुमारे १००० पेक्षा जास्त विद्यार्थी व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. पदयात्रेच्या मार्गावर फुले-शाहू-आंबेडकर उद्यान कृती समितीने उभारलेले विविध महापुरुषांचे देखावे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.सहभागी सर्वांना पाणी व अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, क्रीडा अधिकारी कैलास लटके, अक्षय बिरादार, मार्गदर्शक डॉ.शुभांगी रोकडे, डिंपल ठाकरे, तसेच नेहरू युवा केंद्राचे वैभव लांडगे, विश्वास खंदारे, सुनील घोगरे, किशोर भोकरे, सुरेश कळमकर व व्यंकटेश दंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
