भारत शिक्षण संस्थेच्या माकणी येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदावर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व रसायनशास्त्र विषयाचे अनुभवी प्राध्यापक डॉ. धनंजय विठ्ठलराव माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व प्रशासकीय कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. धनंजय माने हे सध्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथे रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना ३४ वर्षांचा प्रदीर्घ अध्यापन अनुभव तसेच १३ वर्षांचा प्रशासकीय अनुभव लाभला आहे. त्यांनी एम.एस्सी. (रसायनशास्त्र), बी.एड., पीएच.डी. आणि एमबीए अशा उच्च शैक्षणिक पात्रता संपादन केल्या आहेत. संशोधन क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य असून त्यांना ३३ वर्षांचा संशोधन अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून ६ संशोधक सध्या संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १३० संशोधन निबंध प्रकाशित केले असून ४ पेटंट्स त्यांच्या नावे नोंद आहेत. डॉ. माने यांना यूजीसी टीचर रिसर्च फेलोशिप, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट एनएसएस कार्यक्रम समन्वयक पुरस्कार, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट एनएसएस कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी एनएसएस कार्यक्रम समन्वयक, उपसंचालक – यूजीसी एचआरडिसी, तसेच प्रादेशिक संचालक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विविध महत्त्वपूर्ण पदांवर यशस्वीपणे कार्य केले आहे.

या नियुक्तीबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे, सचिव पद्माकर हराळकर जनार्धन साठे तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक, सेवानिवृत्त प्राचार्य डा. घनशाम जाधव, उपप्राचार्य डॉ. डी. व्ही. थोरे, आदिनी डॉ. माने यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनपरंपरा आणि सर्वांगीण विकास अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. डॉ. माने यांच्या नियुक्तीमुळे संस्थेच्या शैक्षणिक परंपरेत नवे पर्व सुरू होणार असल्याची भावना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








