लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील कु. किर्ती तुषार चव्हाण यांची भारतीय रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षेत तिकीट क्लर्क पदासाठी निवड झाली असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तालुक्यातील उंडरगाव येथील किर्ती चव्हाण यांच्या आयुष्यातील संघर्ष प्रेरणादायी आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला होता. मात्र आई शोभा चव्हाण यांनी कष्ट, जिद्द आणि त्यागाच्या जोरावर मुलीचे शिक्षण खंडित होऊ दिले नाही. हलाखीच्या परिस्थितीतही मुलीला उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आईच्या त्यागाची आणि स्वतःच्या मेहनतीची जोड देत किर्ती यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अखेर त्यांच्या चिकाटीला यश मिळाले आणि भारतीय रेल्वेसारख्या प्रतिष्ठित विभागात त्यांची निवड झाली. त्यामुळे उंडरगावसह संपूर्ण लोहारा तालुक्याचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करता येते,” हे किर्ती चव्हाण यांच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.








