केंद्र शासनाने सन २०२५ पर्यंत क्षयरोग दूरीकरण ध्येय ठेवले आहे. १८ वर्षावरील जोखमीच्या लोकांचे बीसीजी लसीकरण नवीन क्षयरुग्ण कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या संशोधना अंतर्गत ६० वर्षाहून अधिक वयाच्या सर्व प्रौढांना हि लस देण्यात येणार आहे. तसेच १८ वर्षावरील ज्या व्यक्तींना मागील ५ वर्षात क्षयरोग झाला आहे. तसेच क्षयरुग्णांच्या कुटुंबातील सदस्य ज्यांचा बीएमआय १८ किलो ग्रॅम/ मीटर स्क्वेअर पेक्षा कमी असलेले व्यक्ती, धुम्रपान करणारे, मधुमेह असणारे १८ वर्षा वरील व्यक्तीना लस देण्याचा शुभारंभ सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात बुधवारी (दि.४) करण्यात आला.
स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी फीत कापून बीसीजी लसीकरण योजनेचा शुभारंभ केला. यावेळी स्पर्श ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. भक्तराज ठोंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव माडजे, तालुका वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर बिराजदार, प्राथमिक आरोग्य केंद्र माकणीचे आरोग्य सहाय्यक युवराज गायकवाड, किशोर काळे यांच्यासह स्पर्श रुग्णालयाचे सर्व कर्मचारी, सुपरवायझर संगीता क्षीरसागर, बेबी आयेशा कादरी तसेच सर्व आशा उपस्थित होत्या. सास्तुर येथील ६७८ लाभार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे. दिनांक ४, ६, ९, ११, १३, १८, २०, २३, २४, २५, २७, ३० सप्टेंबर या दिवशी स्पर्श ग्रामीण रुग्णालयात ही लस देण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की गरोदर माता/ स्तनदा माता सद्यस्थितीत क्षयरोग उपचार घेत असलेले क्षयरुग्ण, एचआयव्ही /कर्करोग ग्रस्त, अवयव प्रत्यारोपण झालेल्या गंभीर आजार/ दुर्धर आजार मागील ३ महिन्यात रक्त संक्रमण केलेल्या व्यक्ती इत्यादी १८ वर्षावरील व्यक्तींना ही लस दिली जाणार नाही. ही लस एकदम सुरक्षित आहे. लसीकरणानंतर इंजेक्शनच्या ठिकाणी सौम्य व्रण किंवा डाग निदर्शनास येईल. बीसीजी लस घेतलेल्या दहा पैकी एका व्यक्तीला हे लक्षण दिसू शकते. तरी या लसीची भीती न बाळगता भविष्यात क्षयरोगासारखे आजार होऊ नयेत यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ही लस आवश्य घ्यावी असे आवाहन रमाकांत जोशी यांनी यावेळी केले.