शेतात कांदे कापण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेचा गळा आवळून खून (murder) झाल्याची घटना लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे घडली असून या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२८) सायंकाळी ५.४० च्या सुमारास तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात (police station) दिगंबर दुनगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील तोरंबा येथील रुपाली दुनगे ही विवाहित महिला रविवारी गावातील रनखांब यांच्या शेतात कांदे कापण्यासाठी गेली होती. दुपारी जेवणासाठी घरी येते असे सांगून गेली होती परंतु दुपारी घरी न आल्याने त्यांचे पती दिगंबर दुनगे हे शेताकडे गेले. परंतु त्याठिकाणी रुपाली नव्हत्या. त्यामुळे त्यांनी विचारपूस केली असता ती इथे नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे दिगंबर दुनगे यांनी गावातील अन्य दोघांना सोबत घेऊन त्यांची पत्नी रुपालीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेतातील ज्वारीच्या फडात रूपालीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी हजर झाले व पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी घटनास्थळी भेट दिली.
कांदे कापण्यासाठी बोलावून घेऊन गजेंद्र गोविंद रनखांब, ललिता बिभीषण रनखांब, बिभीषण बालाजी रनखांब यांनी संगनमत करून पत्नी रुपाली हिचा ओढणीने किंवा कशाने तरी गळा आवळून खून केल्याची फिर्याद लोहारा पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार सोमवारी (दि. २९) सायंकाळी ५.४० च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी लोहारा पोलीस ठाण्यात अटक आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते हे करत आहेत. मयत रुपाली हिच्या पार्थिवावर सोमवारी रात्री ८ च्या सुमारास तोरंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.