राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान उपक्रमांतर्गत निक्षयमित्र योजनेत उपचार दरम्यान सकस पोषण आहारासाठी रुग्ण दत्तक घेऊन त्यांना सहा महिन्याच्या क्षयरोग उपचार सोबत सुरु करण्यात आलेल्या सहा महीन्या पर्यंतच्या पोषण आहारामुळे क्षयरुग्णांच्या आजारात व तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत आहे असे प्रतिपादन सास्तुर (sastur) येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सास्तुर गावातून रॅली व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रविवारी (दि.२४) आयोजित कार्यक्रमात जोशी बोलत होते. होय, आपण क्षयरोगाचे निर्मुलन करू शकतो हे यावर्षीचे क्षयरोग निर्मुलन थीम असल्याचे रमाकांत जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ रफिक अन्सारी यांनी व्हीसी व्दारे या कार्यक्रमात भाग घेतला. क्षयरोग दुरीकरणासाठी सर्व जनता आता नव्या जोमाने कामाला लागली आहे. पोषण आहारासाठी निक्षयमित्र बनून लोक उस्फूर्तपणे क्षयरुग्ण दत्तक घेऊन दानशूर व्यक्ती सहकार्य करत आहेत. त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूरच्या रुग्ण कल्याण समितीचे ज्ञान प्रबोधिनीचे संस्था प्रतिनिधी सुहास फाटक यांनी क्षयरुग्णांच्या पोषण आहारासाठी समाजात जनजागृती करून रु. ४५००० देणगी क्षयरुग्णांच्या पोषण आहारासाठी रुग्ण कल्याण समितीला दान केल्यामुळे उमरगा-लोहारा तालुक्यातील जवळपास ६२ रुग्णांना पोषण आहार किट दिल्यामुळे उपचारसोबत सकस आहार सुरु झाल्यामुळे रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यांचे वजन वाढत आहे असे रमाकांत जोशी यांनी सांगितले.
दत्तक घेतलेल्या प्रती क्षयरुग्णांस पोषण आहारासाठी गहू/ बाजरी ३ किलो, डाळी १.५ किलो, खाद्यतेल २५० ग्रॅम, दुधपावडर १ किलो, अंगाचे साबण/ कपड्याचा साबण ई. दिले जाते असे ते म्हणाले. क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, खोकताना शिंकताना रुमालाचा किंवा हातबाहीचा वापर करणे. संतुलित आहार व्यायाम उपचार यामुळे क्षयरोग संपूर्ण बारा होतो असे ते म्हणाले. वाटा अमूल्य आरोग्य सेवेचा, थांबवतो प्रसार क्षयरोगाचा. नव्या कल्पनेतून गतिमान होऊ क्षयरोगा विरुद्ध लढा चालू ठेऊ, एकच नारा क्षयरोगाला हद्दपार करा या व अशा इतर घोषणांनी सास्तूर गावात आयोजित रॅलीमुळे जनजागरणामुळे परिसर दुमदुमून गेला. या प्रसंगी ज्ञानेश्वर बिराजदार यांनी क्षयरोग बद्दल माहिती सांगितली. दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षनीय घट किंवा भूक न लागणे मानेवर गाठी, बेडक्यातून रक्त पडणे अशी लक्षणे असल्यास नजीकच्या सरकारी दवाखान्यात जाऊन क्षयरोग संबंधी बेडका व इतर गरजेच्या तपासण्या करून उपचार करून घावे असे ते म्हणाले. क्षयरोगमुक्त गाव हि माझी जबाबदारी आहे. क्षयरोगाचा प्रसार टाळून आपल्या प्रियजनाची काळजी घ्यावी असे ते म्हणाले.
क्षयरोग टेक्निकल सुपरवायझर नागेश ढगे यांनी क्षयरुग्णांना मोफत दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले कि, क्षयरोग निदानासंबंधी सर्व तपासणी, क्षयरोगाचा औषधोपचार, उपचार दरम्यान नियमित आरोग्य तपासणी, आरोग्य कर्मचाऱ्या मार्फत नियमित भेटी या सुविधा मोफत मिळतात. रुग्णाला पोषण आहारासाठी उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णाच्या खात्यात दर महा रु.५०० जमा होतात. रुग्णांनी या शासकीय योजनांचा लाभ घेऊन क्षयरोगापासून १०० टक्के मुक्ती मिळवावी असे आवाहन त्यांनी केले. या क्षयरोग रॅली व क्षयरोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालय स्पर्शचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्तराज ठोंबरे व सर्व डॉक्टर, कर्मचारी, सास्तूर येथील आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या, हॅलो मेडिकल फौंडेशन अणदूरच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, गावातील नागरिक, रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वल कारभारी यांनी तर पवण राठोड यांनी आभार मानले.