दीपावलीच्या निमित्ताने स्वतःचे कुटुंब / नातेवाईक सोडून देश रक्षणासाठी सीमेवर आपली दिवाळी साजरी करणाऱ्या भारतीय सैनिक जवानांसाठी लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आकर्षक असे शुभेच्छा कार्ड तयार करून त्यांना दीपावलीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.
तालुक्यातील माकणी येथील भारत विद्यालयात कार्यानुभव विषयाच्या माध्यमातून बनवलेले रंगबिरंगी आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य/ मुख्याध्यापक व्यंकटराव गुंजोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः कमीत कमी खर्चामध्ये कार्यानुभव व कला विषय शिक्षक शुभांगी शिंदे व नसीर पाशा मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या दीपावलीच्या शुभेच्छा कार्डांचे सर्वांनी कौतुक केले. स्वतःचे घर परिवार सोडून आपल्यासाठी अहोरात्र देशाचे संरक्षण करत असणाऱ्या भारतीय जवानांसाठीचा हा एक आपुलकीचा संदेश या निमित्ताने

विद्यार्थ्यांकडून देताना दिसला. विद्यार्थ्यांमध्ये असलेली जिज्ञासू वृत्ती, कला गुण यांना वाव देण्याच्या दृष्टीने प्रशालेत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे राबवले जातात. यावेळी बनवलेल्या आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड मधून प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक काढण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक गणेश साठे, किशोर पवार, उमेश कडले, विजय पवार, दीपक शिंदे, रामराव पवार, प्रशांत दिगीकर, स्वप्निल मोरे, श्री. गोरे, प्रभाकर बनसोडे, राजेश्वर वाघमारे उपस्थित उपस्थित होते.






