धाराशिव दि.२६ (जिमाका) जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्यामुळे शेतीपुरक व्यवसायाला चालना देण्यात येईल.नागरिकांना शुध्द व स्वच्छ पाणी,मुलांना दर्जेदार शिक्षण,आरोग्याच्या चांगल्या सुविधा आणि बेरोजगारांच्या हातांना काम उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिली.
आज २६ जानेवारी रोजी ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस मुख्यालयाच्या मैदान क्र.२ येथे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतांना बोलत होते.या समारंभाला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री राणाजगजितसिंह पाटील, कैलास पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलीस अधिक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक गौहर हसन, प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले,राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना आहे.या योजनेचा ३ टप्प्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील ४ लक्ष ३ हजार ६०० महिला पात्र ठरल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालय येथे गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ४८९५ प्रशिक्षणार्थी विविध शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण घेत आहे. सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जाणार असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगून श्री.सरनाईक म्हणाले,या रेल्वे मार्गामुळे श्री क्षेत्र तुळजापूर रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहे.त्यामुळे देश-विदेशातील भाविकांना तुळजापूर येथे येण्याचा मार्ग सुकर होणार आहे.श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदीर विकासाचा २१०० कोटी ७० लक्ष रूपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून मुख्यमंत्री यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केला आहे.कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत २१ टिएमसी पाणी जिल्ह्याला सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.परंडा,भूम,वाशी,कळंब व धाराशिव तालुक्यातील ३५ गावातील १४ हजार ९३६ हेक्टर आणि तुळजापूर,उमरगा व लोहारा तालुक्यातील ५४ गावातील १० हजार ८६२ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे.जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये ५० नवीन बसेस लवकरच उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे श्री.सरनाईक म्हणाले.
जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने बाधित शेतपिकांच्या नुकसानीसाठी १ लक्ष २५ हजार ४६० शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर १५९ कोटी २५ लक्ष रूपये जमा करण्यात आल्याचे सांगुन पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट नुकसानीची रक्कम जमा करण्यात येत आहे.गाव तिथे स्मशानभूमी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये दहन किंवा दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४४ हजार ७३९ शेतकऱ्यांना १३० कोटी ७७ लक्ष रूपयांचा लाभ देण्यात आल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना समृध्द आणि सशक्त बनविण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगून पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले,या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सीएससी केंद्रातून मोफत ओळख क्रमांक तयार करून देण्यात येणार आहे.विविध कृषिविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी हा ओळख क्रमांक अत्यंत महत्वाचा आहे.तेव्हा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा,असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी परेडचे निरीक्षण केले.परेडमध्ये पोलीस अंमलदार पुरूष व महिला,गृहरक्षक दल पुरुष-महिला,राष्ट्रीय छात्र सेना, छत्रपती हायस्कुल,श्रीपतराव भोसले हायस्कुल,अभिनव इंग्लीश स्कूल, धाराशिव,श्री.श्री.रविशंकर हायस्कुल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सांजा,दिव्यांग कल्याण विभागाच्या जि.प.शाळेचे विद्यार्थी तसेच वज्र वाहन,क्युआरटी व्हॅन,दंगल नियंत्रण पथक,डॉग पथक,बीडीएस,आपत्ती व्यवस्थापन,अग्नीशमन दल आदीसह आरोग्य विभागाचे वाहन सहभागी होते.
कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी,नागरिक, विद्यार्थी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार हनमंत पडवळ यांनी मानले.