लोहारा तालुक्यात हिंसामुक्त समाज युवा जागर अभियान राबविण्यात येत आहे. तालुक्यातील तावशीगड येथील बालाजी विद्यालय येथे सोमवारी (दि.२५) या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने व स्विस एड व युरोपीयन युनियनच्या सहाय्याने हे अभियान राबविण्यात येत आहे. हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी अहंकारी, संचालक डॉ. क्रांती रायमाने, सामाजिक कार्यकर्त्या मेधा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत असलेल्या अभियानाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या तथा सेवा निवृत्त प्राचार्या डॉ. सविता शेटे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा उदतपूरचे माजी सरपंच माधवराव पाटील होते. या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील संघाचे तालुकाध्यक्ष तानाजी माटे, बालाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उषाताई गवारे, विजय घेवारे, सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई काळे, गोपाळ माने, प्रकल्प समन्वयक बसवराज नरे, तालुका समन्वयक सतीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शाळेच्या विद्यार्थीनींनी पथनाट्यातून विद्यार्थीनींची काढली जाणारी छेड व त्यावेळी करावयाचा प्रतिकार यावर प्रकाश टाकला. माळेगांव येथील विद्यार्थीनींनी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिके दाखवून मुलींमध्ये आत्मविश्वास जागवला. सापशिडीच्या खेळातून बालविवाह, व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसाचार, बालिका, महीलांवरील अत्याचार यांसारख्या समाज विघातक कृतीमुळे आपले व समाजाचे होणारे नुकसान हसत खेळत युवक युवतींना सांगण्यात आले. २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या अभियानात लोहारा, तुळजापूर तालुक्यातील हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात किशोरवयीन मुलं-मुली आणि तरुणाईसोबत तरुण मुला मुलींमधील छेडछाड, ताणतणाव, व्यसनाधीनता, करिअर या विषयाला अनुसरून संवाद साधणार आहे. युवा पिढीतील ताण-तणाव ओळखून त्यातून सकारात्मक दिशा शोधण्यासाठी आणि स्त्रियांवरील हिंसेला विरोध करण्यासाठी त्यांना सक्षम बनवेल. यावेळी खेळ, पोस्टर प्रदर्शन, चित्रफित प्रदर्शन, स्व संरक्षणाचे प्रात्यक्षिके, विद्यार्थ्यांचे वक्तृत्व, मनोगते, प्रश्नमंजुषा, गप्पा, गाणी, गोष्टी, तज्ञांचे मार्गदर्शन असे भरगच्च कार्यक्रम नियोजनानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात घेण्यात येणार आहे.
या अभियानाच्या रथाला डॉ. सविता शेटे, माधवराव पाटील, तानाजी माटे, उषाताई गवारे, यांच्यासह मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून अभियानाचे उद्घाटन केले. यावेळी तावशीगड येथील युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी बालाजी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवराज नरे यांनी केले. सुत्रसंचलन सतीश कदम यांनी तर मेधाताई काळे यांनी आभार मानले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयक बसवराज नरे, तालुका समन्वयक सतीश कदम, नागिणी सुरवसे, समुपदेशिका वासंती मुळे यांच्यासह श्रीराम जाधव, इंदुबाई कबाडे, प्रणिता भोसले, सोपान सुरवसे, स्वाती पाटील, ज्ञानेश्वर जाधव, नूतन गायकवाड, दिनकर गाढवे व गावपातळीवरील ३० पुरुष प्रेरक, ३०महिला प्रेरिका अभियान यशस्वितेसाठी प्रयत्न करत आहेत.