वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद – कळंब चे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील कोरोना वार्ड तसेच शासकीय तंत्रनिकेतन येथील कोविड केअर सेंटरला शुक्रवारी (दि.२) भेट देऊन, तेथील रुग्णाशी तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या जाणुन घेतल्या.
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयामध्ये रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. साहजिकच त्याबाबतीत काही तक्रारी येत होत्या. यंत्रणेच्याही अडचणी समजुन घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाहणी केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले. सध्या फक्त चारच फिजीशियन रुग्णालयामध्ये आहेत. त्याबाबत खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना सेवा देण्याच्या बाबतीत विनंती करुन त्यांनाही यामध्ये सहभागी करण्याबाबत सुचना केल्या.
या संदर्भात आयएमए व जिल्हाधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर डॉक्टरांच्या वेळापत्रकानुसार सेवा देण्यात येणार आहे. लवकरच फिजीशियनचा प्रश्न देखील मार्गी लागेल. याशिवाय अधिकारी तसेच कर्मचारी यांचीही संख्या अपुरी पडत आहे, आहे त्या यंत्रणेवर मनुष्यबळाची कमतरता असल्याने ताण पडत आहे. त्यासाठी कर्मचारी तसेच अधिकारी यांना रुजु होण्याचा कालावधी सात दिवसाचा दिला आहे. तो कालावधी कमी करुन दोन दिवसावर आणण्याची विनंती जिल्हाधिकारी यांना केली आहे. जिल्हाधिकारी यांनी त्याला मान्यता देत त्यामध्ये बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे लवकरात लवकर प्रशासनाला निर्णय घेता येईल. ज्याला संधी आवश्यक आहे, त्यांना ती लवकर मिळेल. यामुळे प्रशासनावरील ताणही हळुहळु कमी होण्याचा मार्ग मोकळा होईल. उपचारानंतर कोवीड केअर सेंटरकडे पाठविण्याबाबत काही प्रमाणात असुविधा होत असल्याची बाब समोर आली. तेव्हा त्याबाबतीतही माहिती घेऊन उपाययोजना करण्यात आली आहे. तेथील स्टाफ कमी असुन तिथेही ते देण्याबाबत सबंधित यंत्रणेला सुचना दिल्या आहेत. याबरोबरच सध्या वाढणारी संख्या पाहता पुन्हा मोहल्ला क्लिनिक सूरु करण्याबाबत नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांना विनंती केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत हे मोहल्ला क्लिनीक तत्काळ सूरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळेही मोठा ताण कमी होणार आहे. त्याच ठिकाणी कोरोना तपासणी करण्याची सोय उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना दिल्या आहेत. याशिवाय आणखी दोन ठिकाणी पाचशे क्षमतेच्या कोवीड केअर सेंटर सूरु कऱण्यात येणार आहे. जेवणाच्या बाबतीत अडचणी असुन त्याबद्दल तहसिलदार यांना त्यामध्ये तातडीने सुधारणा करण्यासाठी सुचना दिल्या. आयसीयु वार्डासह इतरही रुग्णांशी संवाद साधुन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, नगरसेवक खलिफा कुरेशी, कळंब शहरप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, डॉ. मुल्ला, डॉ. निपाणिकर तसेच अन्य डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.