वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी (दि. ३) मतदान झाले. एकूण १३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने ९ जागेवर विजय मिळवला आहे.
या सेवा संस्थेसाठी रविवारी (दि. ३) सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान पार पडले. माकणीसह करजगाव व काटेचिंचोली गावातील एकूण १०३४ मतदार होते. एकूण तेरा जागेसाठी झालेल्या या निवडणुकित खुल्या वर्गासाठी आठ, महिलासाठी दोन, इतर मागास प्रवर्ग एक, अनुसुचित जाती जमाती एक, भटक्या विमुक्त प्रवर्गासाठी एक जागा आरक्षित होती. माकणी हे लोहारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाचे गाव आहे. त्यातच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या दृष्टीने या निवडणूकीला अधिक महत्व आले होते.
त्यामुळे या निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. त्यातच तिन्ही गावातील मातब्बर पुढाऱ्यांनी या निवडणुकित प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. श्री माकणाई सहकार विकास पॅनल व शेतकरी विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. यावेळी ९६३ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर लगेच मतमोजणी पार पडली. यात शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी ९ जागेवर विजय मिळवत सेवा संस्थेवर वर्चस्व मिळवले. तर श्री. माकणाई सहकार विकास पॅनलने ४ जागेवर विजय मिळवला.
निकाल जाहीर होताच शेतकरी विकास पॅनलच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. एन. विभूते व गटसचिव यशवंत कांबळे यांनी निवडणुकीचे काम पाहिले.