वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात दि. २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी फिजिकल डिस्टनसिंग नियमाचे काटेकोर पालन करून तालुक्यातील सास्तुर गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये क्षयरोग विषयावर जनजागृती करण्यात आली.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाने ही जनजागृती रॅली काढली होती. रुग्णालयातून निघालेल्या या जनजागृती रॅलीला स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिष सिन्हा यांनी हिरवा झेंडा दाखवला. गावातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. सास्तुर येथील शिवाजी महाराज चौकात फिजिकल डिस्टनसिंग पाळून क्षयरोग विषयक जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, दोन आठवड्याहून अधिक काळ खोकला, ताप, रात्रीचा येणारा घाम, ताप, वजनात लक्षणीय घट, छातीत दुखणे, थुंकी वाटे रक्त पडणे, मानेला कातडीखाली आलेल्या न दुखणाऱ्या गाठी यापैकी कोणतीही एक लक्षण असल्यास संशयित क्षयरोग म्हणून तपासणी करून घ्यावी. तसेच सर्व सरकारी दवाखाने व स्पर्श ग्रामीण रुग्णालयात क्षयरोगाची तपासणी व उपचार मोफत आहेत. तसेच उपचार घेत असलेल्या क्षय रुग्णास क्षयरोग विभागा कडून दर महिन्याला रू ५००/- पोषण आहारा करिता देण्यात येतात. त्याकरिता क्षयरुग्णाचे आधार, रेशनकार्ड व बँक पासबुक च्या झेरॉक्स उपचार घेत असलेल्या ठिकाणी द्याव्यात. तसेच क्षयरोग उच्चाटन उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्याने प्रयत्न करावेत. क्षयरोग उपचारासाठी रूग्णांना त्वरित रुग्णालयात पाठवून क्षयरोग विषयक तपासण्या करण्यात सर्वांना प्रवृत्त करावे असे आवाहन त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना यावेळी केले. या रॅलीमध्ये स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स, कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, गावातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाली होते.