वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या वैशाली खराडे यांची तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आयुब शेख यांची सोमवारी (दि.१४) बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा नागरी सत्कार करण्यात आला.लोहारा नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले होते. तसेच एका अपक्षाने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ १२ झाले होते. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून वैशाली खराडे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. तर काँग्रेसकडून प्रशांत काळे यांचा अर्ज दाखल केला होता. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काँग्रेसचे प्रशांत काळे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला होता. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगरपंचायतीच्या सभागृहात सोमवारी (दि.१४) दुपारी १२.३० वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गणेश पवार होते. मुख्याधिकारी गजानन शिंदे, कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे यांची उपस्थिती होती. नगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज असल्याने वैशाली खराडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया पार पडली. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आयुब शेख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आयुब शेख यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी पवार यांनी जाहीर केले. यावेळी शिवसेनेच्या गटनेत्या सारिका बंगले, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जालिंदर कोकणे, काँग्रेसचे गटनेते आरिफ खानापुरे, नगरसेविका शामल माळी, मयूरी बिराजदार, कमल भरारे, शमाबी शेख, सुमन रोडगे, आरती कोरे, आरती गिरी, संगिता पाटील, गौस मोमीन, अमीन सुंबेकर, प्रशांत काळे, विजय ढगेआदी नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.
———————
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा नागरी सत्कार
लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी झाल्यानंतर नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना पक्ष निरीक्षक अनंत पताडे, युवा नेते किरण गायकवाड, उमरगा बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, रज्जाक अत्तार, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, किशोर साठे, विजय लोमटे, शिवाजी कदम, नागन्ना वकील, अबुलवफा कादरी, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लोहारा शहराच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. जो शब्द आम्ही लोहारा शहरवासीयांना दिला आहे, तो प्रामाणिकपणे पूर्ण करणार असे प्रतिपादन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी बोलताना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले. प्रास्ताविक माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे यांनी केले. अभिमान खराडे यांनी आभार मानले.