वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार संतोष रुईकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले. त्याप्रमाणे तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम शनिवारी (दि.६) सुरू झाले आहे.
मागील काही दिवसांपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसाने शेतातील पिकांत पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. पिकात पाणी साचल्यामुळे सोयाबीन पीक हातातून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. अशा परिस्थितीत पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात होती. अखेर लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांनी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत आदेश काढले आहेत. त्याप्रमाणे पंचनामे करण्यासाठी कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांची समिती तयार करण्यात आली आहे. हे आदेश प्राप्त होताच तालुक्यात पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्वच ठिकाणी सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
पिकांचे पंचनामे करण्याचे काम तहसीलदार संतोष रुईकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांच्या आदेशाप्रमाणे तालुक्यातील सास्तुर येथे कृषी सहाय्यक दिपक जाधव, तलाठी एस. व्ही. कोकाटे यांनी शनिवारी (दि.६) शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून सोयाबीन, उडीद, मूग पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यावेळी सास्तूर येथील शेतकरी श्रीकांत बाबळसुरे, संभाजी पवार, सुशील पवार, दयानंद स्वामी, मल्लिकार्जुन भुसलगे, जयापा क्षिरसागर, विरेंद्र पवार, सिधू मिटकरी, तुळशीराम माळी आदींसह शेतकरी उपस्थित होते. पुढील काही दिवस हे काम सुरू राहणार आहे. कारण सततच्या पावसामुळे शेतात जाण्यास अडचणी येत आहेत. तरीही कर्मचारी चिखल, पाण्यातून मार्ग काढून पिकांचे पंचनामे करत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन पीक आहे. परंतु सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शेतात अद्यापही पाणी साचले आहे. त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अद्यापही तालुक्यातील बहुतांश ठिकाणी अधून मधून पाऊस पडत आहे.
———-
तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत आदेश काढले आहेत. त्याप्रमाणे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
संतोष रुईकर,
तहसीलदार