वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
नोंदणी पद्धतीच्या विवाहाबद्दल समाजात अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. त्याबद्दल जनजागृती व्हावी व कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत अनावश्यक खर्चाला व खोट्या प्रतिष्ठेला फाटा देऊन उदतपुर येथील माजी सरपंच, एक प्रगतशील शेतकरी माधवराव पाटील यांनी त्यांचा मुलगा आत्माराम याचा विवाह नोंदणी पद्धतीने करून चिपळूण येथील पूरग्रस्तांकरिता आर्थिक मदत करता यावी यासाठी रक्कम दिली आहे.लोहारा तालुक्यातील उदतपुर येथील माजी सरपंच माधवराव पाटील यांचा मुलगा आत्माराम याचा विवाह धानुरी येथील प्रा. आनंदराव सूर्यवंशी यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी ठरला. विवाह नोंदणी पद्धतीने करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दोन्ही कुटुंबियांनीही तयारी दर्शवली. त्यानुसार आत्माराम व ऐश्वर्या यांचा उस्मानाबाद येथे बुधवारी (दि.४) नोंदणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. त्यानंतर सायंकाळी नवरदेव आत्माराम यांच्या घरी कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोविंद साळुंके, आण्णाराव पाटील, बापूराव पवार, गुंडेराव पवार, गोवर्धन मुसांडे, बालाजी पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिदास पवार, पत्रकार गिरीश भगत, माकणीचे उपसरपंच वामन भोरे, दीपक गोरे, अजित पाटील, किरण चिंचोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माधवराव पाटील यांनी या नोंदणी पद्धतीच्या विवाहाबद्दलची भूमिका विषद केली. यावेळी बोलताना माधवराव पाटील म्हणाले की, आपल्या समाजात खोट्या प्रतिष्ठेसाठी विवाहाच्या कार्यक्रमात पैशांची उधळपट्टी होते. परंतु या खोट्या प्रतिष्ठेपाई बहुतांश शेतकरी कर्जबाजारी होतात. यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. कर्जबाजारी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे खोट्या प्रतिष्ठेपाई विवाहात होणारी पैशांची उधळपट्टी खरंच आवश्यक आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच आपल्या समाजात नोंदणी पद्धतीच्या विवाहाबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. सध्या कोरोनाकाळात कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणी पद्धतीच्या विवाहाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी यासाठी हा विवाह नोंदणी पद्धतीने केला असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार म्हणाले की, समाज काय म्हणेल या विचाराने विवाह मोठाच झाला पाहिजे असा समज झाला आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन या पद्धतीने विवाह होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पाटील व सूर्यवंशी कुटुंबियांच्या या निर्णयाचे कौतुक करून पुढील काळात याच पद्धतीने विवाह होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन माधवराव पाटील यांनी चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत करता यावी म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट ला २५ हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला. तसेच आनंदराव सूर्यवंशी यांनीही पूरग्रस्तांना मदत म्हणून २५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. माधवराव पाटील यांना दोन मुले व दोन मुली आहेत. या सर्वांची विवाह त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत साध्या पद्धतीने केली आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.याच कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन माधवराव पाटील यांचे नातेवाईक आशुतोष घोगरे, अतिष पाटील, श्रीकांत पवार व सुमित सूर्यवंशी यांनी आम्हीही आमचा विवाह याच पद्धतीने व कसल्याही प्रकारचा हुंडा न घेता करणार असल्याचे जाहीर केले.