वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली लस सध्या आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्कर्सना दिली जात आहे. ही लस एक मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहे. तसेच ४५ वर्षांवरील गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांनाही ही लस मिळणार आहे. ही लस सरकारी रुग्णालयात मोफत दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरही लस दिली जाणार असून त्याची किंमत किती असेल यावर सरकार पुढील २-३ दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय कॅबिनेट बैठकीनंतर दिली आहे.
सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण सुरू होण्याआधी कोविन ऍप अपडेट होत आहे. ही लस घेण्यासाठी लाभार्थीला आपले नाव कोविन ऍप मध्ये नोंदविणे आवश्यक आहे. कोणत्याही राज्याच्या रहिवाशांना कोणत्याही राज्यात लस घेता येईल. नोंदणी केल्यानंतर लस कोणत्या केंद्रावर, कोणत्या वेळेत घ्यायची हा पर्याय लाभार्थ्याला असेल. या कोविन ऍप वर सरकारी व खाजगी सेंटरची माहिती उपलब्ध होईल. या ऍप वरून लसीकरणाची माहिती, प्रमाणपत्रही डाउनलोड होऊ शकेल. आरोग्य सेतू ऍपवरही कोविनची लिंक उपलब्ध आहे. तेथे लसीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोविन ऍप वर नोंदणी आणि १४ अंकी बेनिफिशियरी रेफरन्स आयडी आवश्यक असेल.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात केली जात आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार ही लस सर्वांना देण्याची तयारी सरकारकडून केली जात असल्याचे समजते. परंतु सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लस मिळेल तेंव्हा मिळेल, सध्या मास्क हीच लस असे समजून बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. तसेच शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.